डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 27, 2024 7:45 PM | Dahihandi | Govinda

printer

दहीकाल्याचा सण उत्साहात साजरा, मुंबईसह राज्यात दहिहंडीचा थरार

राज्यात आज दहीकाल्याचा सण उत्साहात साजरा होत असून विशेषतः मुंबई, ठाण्यात ठिकठिकाणी गोविंदाचा थरार रंगला. अनेक दिवसाच्या सरावानंतर गोविंदा पथकं उंचच उंच बांधलेल्या दहीहंड्या फोडत आहेत. या दहीहंड्यांसाठी लाखो रुपयांची बक्षिसेही लावण्यात आली आहेत. राजकीय पक्षांनीही मोठ्या हिरीरीनं या उत्सवात भाग घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आज या उत्सवाला हजेरी लावली. अनेक थरांचे हे मानवी मनोरे पाहण्यासाठी जागोजागी गर्दी पाहायला मिळत आहे.

 

दहीहंडी संस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या गिरगांव भागात विविध सामाजिक विषयांवर भाष्य करणारे चित्ररथ आज काढण्यात आले. यंदा महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर याद्वारे प्रामुख्याने भाष्य करण्यात आलं. अंधेरीतल्या वेसावे कोळीवाड्यात पुरातन परंपरेप्रमाणे लाकडी काठीला टोकदार अणकुचीदार भाला बांधून भाल्यानं दहीहंडी फोडण्यात आली. दहीहंडी उत्सवादरम्यान नागरिकांच्या करमणुकीसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. ठाण्यात पाचशेपेक्षा अधिक गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्यासाठी हजेरी लावली.

 

नाशिकच्या पुरातन मुरलीधर मंदिरासह इतरत्र श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. गंगापूर रोड, इंद्रकुंड, चेतना नगर या भागात मोठ्या दहीहंड्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. नागपूरच्या दहीहंडी उत्सवात भंडारा, गोंदिया इथून आलेल्या गोविंदा पथकांनीही भाग घेतला आहे.