बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या मोंथा चक्रीवादळाचं आज तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम, विजयनगरम, विशाखापट्टणम, अनकापल्ली, पूर्व गोदावरी, कोनासीमा, काकीनाडा, कृष्णा, नेल्लोर आणि प्रकाशम जिल्ह्यांमध्ये आधीच मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. ताशी ९०-११० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, तसेच किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत आणि अत्यावश्यक सेवा वगळता बहुतेक दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. अनेक रेल्वे आणि विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. मच्छिमारांना समुद्रापासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी काल परिस्थितीचा आढावा घेतला. ३५ हजारहून अधिक लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि विशेष पथके बचाव कार्यासाठी सज्ज आहेत. आज रात्री मोंथा वादळ आंध्र प्रदेशला धडकण्याची शक्यता आहे. तसंच यानम, लगतच्या दक्षिण ओडिशाचा किनारी भाग आणि छत्तीसगडला उद्यापर्यंत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि केंद्रीय मदतीचं आश्वासन दिलं. नायडू यांनी सज्जतेचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना परिस्थितीववर लक्ष देण्याच्या सुचना दिल्या. दक्षिण मध्य पूर्व किनारी रेल्वे आणि विविध विमान सेवा रद्दकरण्यात आल्या आहेत.