मोंथा चक्रीवादळ काल रात्री ९० ते १०० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने आंध्र प्रदेश आणि यानम इथल्या किनाऱ्यावरून मछलीपट्टणम आणि कलिंगपटणमच्या मधून पुढे सरकलं. किनारपट्टीवर धडकल्यानंतर मोंथाची तीव्रता कमी झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातल्या श्रीकाकुलम, विशाखापट्टण, नेल्लोर, काकिनाडा जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झालं. कोनासीमा इथं सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड पडून एकाचा मृत्यू झाला. वादळामुळे ४८ हजार हेक्टरवरची पिकं आणि जवळपास दीड लाख हेक्टरवरच्या फळबागांना मोठा फटका बसला. रस्ते, विजेच्या तारांचंही मोठं नुकसान झालं. वादळाचा धोका लक्षात घेता ७६ हजारापेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
ओडिशामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं पडली आणि रस्ते बंद झाले. इथं कोणतंही मोठं नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही, मात्र काही ठिकाणी दरडी कोसळल्या.
मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराषट्रात लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. यामुळे नदी, नाले, ओढ्यांना पूर आला असून विविध प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काढून ठेवलेल्या सोयाबीन पिकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.
तेलंगणमध्ये राजधानी हैदराबादसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. हवामान विभागानं राज्यातल्या १२ जिल्ह्यांना आज आणि उद्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला असून मोंथा चक्रीवादळ आत सरकत असल्याने सर्वत्र पावसाचा अंदाज आहे.
या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये राजधानी कोलकाता आणि आसपासच्या भागांत वातावरण ढगाळ असून अधूनमधून पावसाच्या मध्यम सरी कोसळत आहेत. दक्षिण २४ परगणा, पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मासेमारांनी उद्यापर्यंत समुद्रात जाऊ नये, अशी सूचना देण्यात आली आहे.
तमिळनाडूमध्ये तीन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर आज सूर्यदर्शन झालं. इथलं जनजीवन पूर्वपदावर येत आहे. चक्रीवादळाचा परिणाम बिहार आणि राजस्थानातही जाणवत असून तिथे मुसळधार पाऊस होत आहे.