श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळात ४७४ जणांचा मृत्यू, ३५६ बेपत्ता

श्रीलंकेत आलेल्या दितवाह चक्रीवादळात आतापर्यंत ४७४ जणांचा मृत्यू झाला असून ३५६ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रानं दिली आहे. भारतानं श्रीलंकेला या काळात मोठी मदत केली असून वायुदल, नौदल आणि एनडीआरएफच्या पथकानं इथं भरीव मदतकार्य केलं आहे. भारतानं आयएनएस सुकन्या जहाजातून पाठवलेली मदतसामग्री श्रीलंकेच्या वायुदलानं हवाईमार्गे पोहोचवली आहे.

 

 

भारतीय वायुदलानंही पूर्वेकडच्या प्रांतात अनेकांना आपल्या हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित स्थळी हलवलं आहे. एनडीआरएफची तुकडी पुट्टालाम गावात तब्बल ८०० लोकांना मदत करत आहे. भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरांनी काल साडेपाच टन अन्नाची पाकिटं पूरग्रस्त भागात टाकली आहेत. दुर्गम भागात अडकलेल्या पूरग्रस्तानाही वायुदलानं वैद्यकीय सुविधा असलेल्या क्षेत्रात पोहोचवलं आहे.

 

भारताच्या सी – १७ ग्लोबमास्टर विमानाद्वारे तात्पुरती वैद्यकीय सुविधा उभारण्यासाठीचं साहित्य श्रीलंकेत पोहोचलं असून त्याबरोबर ७३ जणांचं वैद्यकीय पथकही तिथं गेलं आहे. त्यांच्याद्वारे पूरग्रस्तांना वैद्यकीय मदत दिली जाणार आहे. या साहित्यात ऑपरेशन थिएटरपासून ते इतर वैद्यकीय उपकरणांचा, रुग्णवाहिकांचा आणि इतर वाहनांचा आणि सुविधांचा समावेश आहे. हे साहित्य कोलंबो इथं पोहोचलं असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी दिली आहे.