December 2, 2025 8:03 PM | Cyclone Ditwah

printer

दितवाह चक्रीवादळानं मोठं नुकसान ४१० जणांचा मृत्यू, ३३६ जण अद्याप बेपत्ता

श्रीलंकेत नुकत्याच येऊन गेलेल्या दितवाह चक्रीवादळानं मोठं नुकसान केलं असून विविध दुर्घटनांमध्ये ४१० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याबरोबरच ३३६ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती   श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रानं आज सकाळी  दिली. श्रीलंकेतल्या  २५ जिल्ह्यांमधल्या दीड कोटी लोकांना या चक्रीवादळाचा थेट फटका बसला असून कँडमध्ये सर्वाधिक ८८  तर बदुल्लामध्ये ८३ लोकांना जीव गमवावा लागला. 

 

दरम्यान भारतीय सैन्यदलानं श्रीलंकेच्या नागरिकांच्या मदतीसाठी ऑपरेशन सागर बंधू राबवलं आहे. या द्वारे पूरग्रस्तांसाठीच्या मदतीची व्याप्ती अधिक वाढवताना भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरने आज २ हजार किलो अन्नाची पाकिटे पूरग्रस्त भागात पोहोचवली आहेत. नुवारा या गावातून १७ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली. वायुदलाच्या हेलिकॉप्टरांनी पूरग्रस्त भागात बचाव पथकंही पोहोचवली आहेत. भारत श्रीलंकेतल्या पूरग्रस्ताना सरकारच्या आरोग्य मैत्री प्रकल्पांतर्गत भिष्म क्यूब द्वारे मदत करत आहे. असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.