आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आज सुरुवात झाली. गुवाहाटी इथं सुरु असलेल्या, या स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेपुढं विजयासाठी २७० धावांचं आव्हान ठेवलं आहे. पावसामुळे हा सामना ४७ षटकांचा करण्यात आला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारताची सुरुवात खराब झाली. चौथ्या षटकातच स्मृती मंधाना ८ धावांवर बाद झाली. प्रतिका रावल ३७, तर हरलीन देओल ४८ धावा करुन बाद झाल्या. कर्णधार हरमनप्रित कौर २१, तर जेमिमा रॉड्रिग्ज शून्य, तर रिचा घोष २ धावा करुन तंबूत परतली. मात्र अमनज्योत कौर आणि दिप्ती शर्मा यांच्या शतकी भागिदारीमुळे भारताला चांगली धावसंख्या उभारता आली. अमनज्योतनं ५७, तर दिप्तीनं ५३ धावा केल्या. स्नेह राणानं नाबाद २८ धावांचं योगदान दिलं. त्यामुळे भारताला ४७ षटकात ८ गडी गमावून २६९ धावा करता आल्या.
या स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्यासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका, बांग्लादेश आणि पाकिस्तानच्या महिला संघांमध्ये प्राथमिक फेरीचे २८ सामने होतील.