भारतानं आज श्रीलंकेत कोलंबो इथं झालेल्या पहिल्या दृष्टीहीन महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. भारतानं नेपाळचा ७ खेळाडू राखून पराभव केला आणि विश्वजेतेपदाला गवसणी घातली. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर भारतानं केवळ ३० धावांत नेपाळच्या आघाडीच्या ३ खेळाडूंना बाद केलं. बिमला राय आणि सरिता घिमिरे यांच्या ६५ धावांच्या भागिदारीनं नेपाळचा डाव सावरला. त्यामुळं नेपाळला निर्धारित २० षटकांत ५ खेळाडू गमावून ११४ धावा करता आल्या.
नेपाळनं विजयासाठी दिलेल्या ११५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानंही आपल्या सलामीवीर ३३ धावांतच गमावल्या. त्यानंतर फुला सरेन आणि करुणा यांनी अर्धशतकी भागिदारी करत भारताला विजयाच्या समीप नेलं. अखेर तेराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर फुला सरेन हीनं विजयी चौकार मारून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.