वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा कसोटी सामन्यात विजयासाठी भारताला आणखी ५८ धावा कराव्या लागणार आहेत. फॉलोऑननंतर आज चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजनं पहिल्या डावातली पिछाडी भरून काढली, आणि दुसऱ्या डावाअखेर १२० धावांची आघाडी घेतली. कालच्या २ बाद १७३ धावावरून वेस्ट इंडिजनं आज पुढं खेळायला सुरुवात केली. जॉन कॅम्पबेल आणि शाई होप यांनी तिसऱ्या गड्यासाठी १७७ धावांची भागीदारी करत वेस्ट इंडिजला डावाच्या पराभवाच्या नामुष्कीतून बाहेर काढलं. कॅम्पबेलनं ११५, तर शाई होपनं १०३ धावा केल्या. ३९० धावांवर त्यांचा डाव संपला.
भारतातर्फे या डावात कुलदीप यादव आणि जसप्रित बुमराहनं प्रत्येकी ३, तर महंमद सिराजनं २ गडी बाद केले. आजचा खेळ थांबला तेव्हा दुसऱ्या डावात भारताच्या १ बाद ६३ धावा झाल्या होत्या. के एल राहुल २५, तर साई सुदर्शन ३० धावांवर खेळत होता.