कोलकाता कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून ३० धावांनी पराभव

कोलकाता इथं झालेला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं आज तिसऱ्याच दिवशी भारतावर ३० धावांनी विजय मिळवला, आणि दोन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
आज दक्षिण आफ्रिकेनं आपला दुसरा डाव कालच्या ७ बाद ९३ धावांवरून पुढे सुरू केला. आठव्या गड्यासाठी कर्णधार टेम्बा बवुमा आणि कॉर्बिन यांनी ४४ धावांची भागिदारी केली. मात्र बुमरानं कॉर्बिनला त्रिफळाचित करून ही जोडी फोडली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १५३ धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बवुमा, ५५ धावांची झुंजार खेळी करुन नाबाद राहिला. भारताचा रविंद्र जडेजा यानं सर्वाधिक चार, सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ तर बुमरा आणि अक्सर पटेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
भारतानं पहिल्या डावात ३० धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळं भारताला दुसऱ्या डावात विजयासाठी १२४ धावांचं आव्हान मिळालं. मात्र विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव गडगडला. संघाच्या अवघ्या २ धावा झाल्या असतानाच यशस्वी जैयस्वाल आणि के.एल. राहुल हे दोन्ही सलामीवीर माघारी परतले. भारताच्या इतर फलंदाजांनाही खेळपट्टीवर तग धरता आला नाही, आणि भारताचा संपूर्ण संघ केवळ ९३ धावा करून तंबूत परतला. भारताचा कर्णधार शुभमन गिल याला सामन्यात झालेल्या दुखापतीवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल असल्यानं दुसऱ्या डावात तो फलंदाजीला येऊ शकला नाही. भारताच्या वतीनं वॉशिंगटन सुंदर यानं सर्वाधिक ३१ धावा केल्या.
आफ्रिकेच्या हार्मर यानं भारताचे ४, यान्सन आणि केवश महाराज यांनी प्रत्येकी दोन तर, मार्करम यानं एक गडी बाद केला.
या सामन्यात आठ बळी टिपलेल्या सायमन हार्मर याला सामनावीराच्या किताबानं गौरवलं गेलं.
आता मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना येत्या २२ नोव्हेंबर पासून गुवाहाटी इथं खेळला जाणार आहे.