भारतानं वेस्ट इंडिजविरूद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना एक डाव आणि १४० धावांनी जिंकून मालिकेत १ – ० अशी आघाडी घेतली आहे. भारतानं आज तिसऱ्या दिवशीच वेस्ट इंडिजचा पराभव केला. आजच्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारतानं आपला पहिला डाव ५ बाद ४४८ धावांवर घोषित केला.
त्यावेळी भारताकडे २८६ धावांची आघाडी होती. त्यांनतर फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. भारताच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत वेस्ट इंडिजला जम बसवू दिला नाही. वेस्ट इंडिजच्या अलिका अथानाझे याच्या ३८ धावा वगळता इतर कोणताही खेळाडू आपली चमक दाखवू शकला नाही.
वेस्ट इंडिजचे फलंदाज झटपट बाद होत गेल्यानं त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही, त्यांना सर्व बाद १४६ धावाच करता आल्या. रविंद्र जडेजानं चार, कुलदीप यादवने दोन, तर वॉशिंग्टन सुंदर आणि मोहम्मद सिराजनं प्रत्येकी एक गडी बाद केला.