देशाचा किरकोळ महागाईचा दर यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात कमी होऊन पाव टक्क्यावर आला. २०१५ सालापासूनचा हा ग्राहक भाव निर्देशांकावर आधारित सर्वात नीचांकी दर आहे.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात महागाईचा दर कमी होऊन तो ग्रामीण भागात पाव टक्के, तर शहरी भागात ८८ शतांश टक्के इतका नोंदवला गेला. अखिल भारतीय अन्न दर निर्देशांकावर आधारित अन्नधान्याचा महागाई दर, सलग पाचव्या महिन्यात कमी झाला, आणि ऑक्टोबर महिन्यात तो आणखी घसरून ५ टक्क्यावर आल्याचं यात म्हटलं आहे.
ऑक्टोबर महिन्यात ग्रामीण भागात अन्नधान्याचा महागाई दर कमी होऊन ४ पूर्णांक ८५ शतांश टक्क्यावर, तर शहरी भागात ५ पूर्णांक १८ शतांश टक्क्यावर आला.
जीएसटी मध्ये झालेली कपात, अनुकूल आधारभूत दर, आणि त्यामुळे तेल आणि चरबी, भाज्या, फळं, पादत्राणं, वाहतूक आणि दळणवळण या क्षेत्रातली महागाई कमी झाल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात महागाईचा आणि अन्नधान्याचा महागाई दर कमी झाल्याचं यात म्हटलं आहे.