सागरी सीमांनी जोडलेल्या देशांनी आपल्या प्रदेशातलं स्थैर्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत होत असलेल्या कोलंबो सुरक्षा परिषदेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या सातव्या बैठकीत बोलत होते. वेगाने बदलणाऱ्या आणि आव्हानात्मक असलेल्या जागतिक सुरक्षेच्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले.
मालदीव, मॉरिशस, श्रीलंका आणि बांगलादेश यांसारख्या सदस्य देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या बैठकीत सहभागी झाले आहेत. या बैठकीत सागरी सुरक्षा, दहशतवाद आणि कट्टरतावादाचा मुकाबला, आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी, सायबर सुरक्षा, महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे.