दोन वर्षांहून कमी वयाच्या बालकांना सर्दी-खोकल्याची औषधे दिली जाऊ नयेत, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये कथित कफ सिरपच्या सेवनानं काही मुलांचे मृत्यू झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा सल्ला दिला आहे. पाच वर्षांहून कमी वयाच्या मुलांना साधारणपणे ही औषधे दिली जात नाहीत आणि पाच वर्षांपेक्षा मोठ्या वयाच्या मुलांसाठी या औषधांचा वापर सावधगिरीनं आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली करणं आवश्यक आहे, असं मंत्रालयानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे. सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या आरोग्य सेवा संचालकांना पत्र लिहून या सूचना केल्या आहेत.
दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये कफ सिरपच्या सेवनानं मुलांचे मृत्यू झाल्याचे नमूद करणारा एक अहवाल आला. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या प्रतिनिधींच्या एका संयुक्त पथकानं घटनास्थळाची पाहणी केली. तेथील औषधांचे अनेक नमुने संकलित केले.
राजस्थान सरकारने औषध नियंत्रक राजाराम शर्मा यांचं निलंबन केलं आहे आणि केसन फार्मा कंपनीच्या सर्व १९ औषधांचं वितरण रोखलं आहे. मुख्यमंत्री मोफत औषध योजनेअंतर्गत वितरित कफ सिरपाच्या सेवनानं कथित दोन मुलांचा मृत्यू आणि अन्य मुले आजारी पडल्याच्या घटनेनंतर ही कारवाई करण्यात आली.