राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये कफ सिरपच्या सेवनानं काही मुलांचे मृत्यू झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांची बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी चार वाजता आरोग्य मंत्रालयाच्या सचिवाच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, आरोग्य सचिव यात सहभागी होणार आहेत. तसंच औषध नियंत्रक देखील सहभागी होतील. दूरदृश्यप्रणालीद्वारे होणाऱ्या या बैठकीत कफ सिरपचा गैरवापर तसंच औषधांची गुणवत्ता यावर चर्चा होणार आहे.
दरम्यान, दोन वर्षांहून कमी वयाच्या बालकांना सर्दी-खोकल्याची औषधं दिली जाऊ नयेत, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या. पाच वर्षांहून कमी वयाच्या मुलांना साधारणपणे ही औषधे दिली जात नाहीत आणि पाच वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी या औषधांचा वापर सावधगिरीनं आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली करणं आवश्यक आहे, असं मंत्रालयानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे.