प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेस नेत्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करुन काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी करत, सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी आज संसदेत गदारोळ केला. घोषणाबाजी सतत चालू राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसातून दोनदा तर राज्यसभेचं कामकाज एकदा तहकूब झालं.
दिल्लीच्या रामलीला मैदानावर काल झालेल्या काँग्रेसच्या सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा मुद्दा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर उपस्थित केला. या मुद्द्यावरुन काँग्रेसनं माफी मागावी अशी मागणी जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेत केली. त्यामुळं झालेल्या गोंधळात दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब झालं.
कामकाज सुरू झाल्यावर लोकसभेत कायदा रद्द करणं आणि दुरुस्ती विधेयक, अणुउर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती विधेयक तसंच विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक सादर झालं. शिक्षा विधेयकातून UGC, AICTE आणि NCTE चं एकत्रीकरण होणार आहे. हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय लोकसभेनं घेतला. लोकसभेत आज एक लाख ३२ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांवरही चर्चा झाली.
राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर निवडणूक सुधारणांविषयी चर्चेला सुरुवात झाली. स्वच्छ आणि अचूक निवडणूक प्रक्रियेमुळे लोकशाही आणि मतदार सक्षम होतात, असं अण्णा द्रमुकचे नेते डॉक्टर एम तंबीदुराई म्हणाले. मतदानाचं सीसीटीव्ही फूटेज सार्वजनिक करावं तसंच लाईव्ह वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध करावी असं वायएसआर काँग्रेसचे वाय व्ही सुब्बा रेड्डी म्हणाले. तर मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षणावरून सरकारवर आरोप करणाऱ्या विरोधकांवर माजी प्रधानमंत्री एच डी देवेगौडा यांनी टीका केली. समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव यांनी मतदान मतपत्रिकांद्वारे घेण्याची मागणी केली.