सन २०२४-२५ मधे देशातलं कोळसा उत्पादन एक अब्ज टनापर्यंत गेल्याचं कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. कोळसा उत्पादन क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या आहेत. भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा कोळसा उत्पादक आणि वापरकर्ता देश असल्याचं रेड्डी यांनी सांगितलं. कोळशापासून वायू निर्मिती करण्यावर सरकारचा भर असून २०३० पर्यंत १० कोटी टन निर्मिती करण्याचं लक्ष आहे, भूमिगत वायू निर्मिती करण्याची क्षमता असलेल्या २१ कोळसा खाणींचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दोन हजार किलोमीटर रेल्वेमार्गांवर कवच प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत सांगितलं. प्रवासी आणि रेल्वेच्या सुरक्षेसाठी कवच ही स्वयंचलित ट्रेन सुरक्षा प्रणाली सुरू करण्यात आली असून आतापर्यंत चार हजार किलोमीटर रेल्वेमार्गावर ही प्रणाली स्थापित करण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.