अमरावती इथल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार’ यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर झाला आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी आज अमरावती इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महोत्सवात विदर्भातील शेतकऱ्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेल्या निधीतून शेतीक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी महिलेला ‘शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार’, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निधीतून पुरूष शेतकऱ्याला ‘शरद जोशी उत्कृष्ट पुरूष शेतकरी पुरस्कार’ देण्यात येणार आहे. १ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असं या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे तर पाच लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराचं स्वरूप आहे.