अमेरिकेनं भारतावर लादलेल्या आयात शुल्काला अडचण न समजता इष्टापत्ती समजावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत जागतिक आयात निर्यात धोरणाच्या अनुषंगानं केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. व्यापार सुलभता धोरण सरकारनं आखलं असून त्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र वॉर रूम स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
नवीन उद्योगांबरोबरच सध्या अस्तित्वात असलेल्या उद्योगांच्या विकासासाठी शासन सकारात्मक आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. उद्योगांच्या परवानग्यांसाठी असलेलं सिंगल विंडो पोर्टल अधिक सक्षम करावं, पाच हेक्टर क्षेत्रावरील कृषी प्रक्रिया किंवा कृषीवर आधारित उद्योगांसाठी कुठल्याही परवानगीची आवश्यकता असू नये, यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.