आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर, आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत असल्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारांकडे सजगपणे बघावं, सावध राहावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज नागपूरमध्ये केलं. आर्थिक फसवणुकीला बळी पडलेल्यांना सुमारे १० कोटी रुपये परत देण्याचा कार्यक्रम, तसंच नागपूर पोलिसांनी विकसित केलेल्या गरुडदृष्टी समाजमाध्यम निगराणी प्रकल्पाचं सादरीकरण फडनवीस यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते.
देशातली सर्वात उत्तम सायबर गुन्हेगारीविरोधी यंत्रणा महाराष्ट्राकडे आहे, याचा उल्लेख त्यांनी केला. तसंच, गरुडदृष्टी प्रकल्पाद्वारे समाजमाध्यमावरच्या द्वेषपूर्ण, गुन्हेगारी पोस्ट्सवर कारवाई करण्यात आल्याचंही फडनवीस यांनी सांगितलं.
नागरिकांनी फसवणूक झाल्यावर तातडीनं १९३० किंवा १९४५ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली तर वेळीच योग्य ती कारवाई करून ही फसवणूक थांबवता येईल, असं ते म्हणाले.