नागरिकांचं जीवनमान सुलभ करण्यासाठी शहरी परिवहन सेवेत आमूलाग्र आवश्यक असून, त्यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करावं, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिले. ते आज मुंबईत यासंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते.
सध्या वेगवेगळ्या महानगरांमध्ये महापालिका, राज्य परिवहन महामंडळ, रेल्वे, मेट्रो आदी यंत्रणांच्या माध्यमातून परिवहन सेवा सुरु आहेत. महानगरांमधल्या परिवहन सेवेच्या विकास आणि विस्तारासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करणं गरजेचं आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध परिवहन सेवांचं एकच भाडे, शहरांमध्ये सुरू असलेले परिवहन प्रकल्प, आदींबाबत समन्वय साधणं सोयीचं होईल, असं ते म्हणाले.
महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची ९१ वी बैठकही यावेळी झाली. आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळावर दोन हेलिपॅड आणि आठ वाहनतळ उभारायला मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत मान्यता दिली. अमरावती विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा आराखडा सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.