राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचं चित्र येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.छत्रपती संभाजीनगर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. या निवडणुकांच्या जागावाटपाचे निर्णय जिल्हास्तरावर होतात, त्यामुळे काही ठिकाणी महायुती झाली आहे, काही ठिकाणी दोन पक्ष एकत्र आले आहेत, तर काही ठिकाणी कोणत्याही पक्षांमध्ये युती झालेली नाही. यावर चर्चा सुरू आहे, असंही ते म्हणाले. महानगरपालिकांच्या निवडणुकीत मात्र शक्य तिथं युती होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशोभीकरणाच्या कामाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.
त्यानंतर क्रांतीचौक इथं स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचं लोकार्पण आणि कमल तलाव पुनरुज्जीवनाच्या कामाचं लोकार्पणही फडणवीस यांनी केलं. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी चिकलठाणा इथं भाजपच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन केलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सातारा परिसरातल्या श्रीयश आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय तसंच संशधोन केंद्राच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होणार आहे.