आपले सरकार वेबसाइटची लोकाभिमुख, सुधारित आवृत्ती २ ऑक्टोबरपर्यंत सुरू करा. इतर विविध वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या शासनाच्या सेवा आणि योजना या वेबसाइटवर उपलब्ध करुन द्या, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत दिले. आतापर्यंत सेवा हक्क हमी कायद्यामध्ये सेवांचीच हमी दिली जात होती. यापुढे पात्रतेच्या निकषावर योजनांच्या लाभाची हमीही नागरिकांना देण्यात यावी, असंही त्यांनी सांगितलं.
राज्य सरकारनं आज तब्बल १ लाख ८ हजार कोटीं रुपयांहून अधिक रकमेच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या गुंतवणुकीतून एकूण ४७ हजारांहून अधिक रोजगारांची निर्मिती होणार आहे. या गुंतवणुकीपैकी कोकण विभागात ३५ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून १६ हजार रोजगार, नाशिक विभागात एकवीसशे कोटींच्या गुंतवणुकीतून ६०० रोजगार आणि विदर्भात ७० हजार कोटींच्या गुंतवणुकीतून साडे ३० हजार रोजगारांची निर्मिती होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.