‘हायब्रीड ऍन्युइटी मॉडेल, फेज -१’ या प्रकल्पामुळे पायाभूत सुविधांना लक्षणीय चालना मिळाली

राज्यात पायाभूत सुविधांचं काम विलक्षण वेगानं सुरु असून ‘हायब्रीड ऍन्युइटी मॉडेल, फेज -१’ या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्याच्या पायाभूत सुविधांना लक्षणीय चालना मिळाली आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

 

पायाभूत सुविधांसाठी राज्यात ४१ हजार ७३० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून सुमारे सहा हजार किलोमीटर रस्त्यांची कामं या प्रकल्पाअंतर्गत केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. आत्तापर्यंत २५ हजार ८७५ कोटी रुपयांची तरतूद झाली असून अनेक बँकांच्या आर्थिक सहकार्यामुळे मजबूत आणि संपर्कक्षेत्र विस्तारलेल्या राज्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी X या समाज माध्यमावर नमूद केलं.

 

शंभर दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत विक्रमी वेळेत पाच टक्क्यांनी अधिक प्रगती करत या प्रकल्पानं अपेक्षा पूर्ण केल्या आहेत, तसंच या वर्षभरात अंदाजे एक लाख कोटी रुपयांचा पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. एमएसआयडीसी अर्थात महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या आढावा बैठकीचं अध्यक्षपद भूषवल्यानंतर ते बोलत होते. 

 

शंभर दिवसात एकूण ३४ जिल्ह्यांमधल्या सुमारे पाच हजार ९७० किलोमीटर रस्त्यांचं अद्ययावतीकरण करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आखण्यात आला होता, त्यानुसार निर्धारित वेळेत हे लक्ष साध्य झाल्याचं बैठकीला उपस्थित असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी सांगितलं.