विदर्भातली खनिजसंपत्ती, वन उत्पादनं, कापूस उद्योग या जमेच्या बाजू विकासाच्या दृष्टीनं लक्षात घेऊन उद्योजकांनी पुढाकार घ्यावा त्याकरता केंद्र आणि राज्यसरकार सर्वतोपरि सहकार्य करेल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज या उद्योजक संघटनेच्या विदर्भ विभागीय कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर आज नागपुरात ते बोलत होते.
रायपूर ते विशाखापट्टणम हा महामार्ग पूर्णत्वास जात असताना गडचिरोली त्याला जोडल्यास आंध्रप्रदेशातली बंदरं विदर्भासाठी अधिक जवळची ठरतील असं ते म्हणाले. देशात मालवाहतुकीवरचा खर्च पूर्वी १६ टक्के होता. तो चांगल्या रस्त्यांमुळे आता १० टक्क्यांवर आला आहे आणि भविष्यात तो ९ टक्क्यांवर आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.