नाताळचा सण आज सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. देशभरातल्या चर्चेस आणि प्रार्थनागृहांमधे काल रात्री प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवानिमित्त विशेष प्रार्थनांचं आयोजन करण्यात आलं होतं. चर्चेसवर रोषणाई करण्यात आली आहे. नाताळनिमित्त भेटवस्तू घेऊन येणाऱ्या सांताक्लॉजच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहेत. दुकानं, मॉल्स, उपाहारगृहं आणि पर्यटनस्थळांवर गर्दी झाली आहे. नाताळ निमित्त आज मुंबईतले शेअर, वस्तू, आणि वायदे बाजार बंद आहेत. नाताळनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून चर्चमध्ये येशू जन्माचे देखावे साकारण्यात आले तसंच कॅरोल गायनासह विविध कार्यक्रम झाले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी देशवासियांना नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या सणातून शांती, सलोखा, समता आणि सेवेचा संदेश समाजाला मिळतो असं राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. येशू ख्रिस्तांची शिकवण सामाजिक नात्यांचे बंध दृढ करते आणि शांततेचा पुरस्कार करते अशा शब्दात उपराष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतल्या कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशनमधे जाऊन सामूहिक प्रार्थनेत भाग घेतला. नाताळचा सण समाजात सद्भावना आणि सलोखा निर्माण करतो असं त्यांनी शुभसंदेशात म्हटलं आहे.