डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

उत्तम शिक्षण आणि मनुष्यबळ विकासाच्या जोरावर महाराष्ट्र देशाच्या विकासाचे नेतृत्व करेल, असा मुख्यमंत्र्यांना विश्वास

देशाच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यात मंत्रालय इथं मुख्य शासकीय सोहळा झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना तसंच शहीद जवानांनाही आदरांजली वाहिली. जगातली सर्वोत्तम उत्पादनं भारतात तयार करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं ते उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. स्वदेशी उत्पादनांचा वापर करून आत्मनिर्भर भारताला बळकटी दिली जात आहे,  देशात येत असलेल्या परदेशी गुंतवणुकीपैकी ४० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे, तसंच वस्तू निर्मिती, निर्यात आणि स्टार्ट-अप्समध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तम शिक्षण आणि मनुष्यबळ विकासाच्या जोरावर महाराष्ट्र देशाच्या विकासाचे नेतृत्व करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या भाषणातून त्यांनी प्रत्येक समाज घटकाचा तसंच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केल्या जात असलेल्या कामांविषयी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांनी दाखवलेल्या वाटेवर महाराष्ट्र चालत राहील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा या त्यांच्या निवासस्थानीही ध्वजारोहण झालं.

पुण्यात राजभवन इथंही ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राष्ट्रध्वज फडकावून तिरंग्याला मानवंदना दिली.

राज्यात मुंबईसह इतरत्रही ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या आयोजन केलं गेलं.मुंबईत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह जागोजागी दिसून येत आहे, हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत अनेक निवासी वस्त्या आणि इमारतींवर तिरंगा डौलानं फडकत असल्याचं चित्र आहे, रस्त्यारस्त्यांवर आबाल वृद्धांच्या हाती दिसणारा तिरंगा आणि जागोजागी देशभक्तीपर गीतांचे सूर कानी पडत असल्यानं अवघं वातावरण देशभक्तीनं भारलेलं आहे.

मुंबईत विधान भवन इथं विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते आणि ध्वजारोहण झालं. यावेळी विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते.

मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं झालेल्या कार्यक्रमात विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी झेंडा फडकावला.

मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.

 मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं गेलं, तर मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी राष्ट्रध्वज फडकावला.

मध्य रेल्वेच्या मुंबई इथल्या राष्ट्रीय मुख्यालयात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीना यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट इथल्या मुख्यालयातही ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांनी झेंडा फडवला.

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात झालेल्या कार्यक्रमात केंद्राचे उपमहासंचालक संजय बोदेले यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.

याशिवाय मुंबईतली सर्व शासकीय आस्थापनं, विद्यापीठ तसंच शाळा महाविद्यालयं, गृहनिर्माण संस्थांमध्येही ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधल्या मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा