राज्यात लवकरच मेगा भर्ती प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत केली. यासंदर्भातल्या एका लक्षवेधी सूचनेवर ते उत्तर देत होते. राज्य सरकारनं सत्तर हजार जागांची भर्ती जाहीर केली होती मात्र प्रत्यक्षात ती एक लाखाच्या वर पोहोचली आहे. आता १५० दिवसांच्या कार्यक्रमात सर्व विभागांना आकृतीबंध सुधारून, भर्तीसेवा नियम नव्यानं तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत, ते होताच मेगा भरती प्रक्रिया सुरू केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमात अनुकंपा तत्वावर प्रलंबित असलेली भरती पूर्ण केली जाणार आहे. सर्व जात वैधता तपासणी समित्या स्थापन केल्या आहेत, ही वैधता तपासणी करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे, त्यामुळे ही कारवाई अधिक पारदर्शी आणि गतिमान होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
भर्ती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्रांना मान्यता देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं.