नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉच्या परिसरात उभारण्यात आलेल्या संविधान उद्देशिका पार्कचं उद्घाटन आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. पार्कच्या आवारात उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पणही यावेळी झालं. ही वास्तू बाबासाहेबांच्या कार्याचं स्मरण आणि प्रेरणा देत राहील असं न्यायमूर्ती गवई यावेळी म्हणाले. संविधानातली मूल्यं जनतेपर्यंत पोहचण्यात या प्रकल्पामुळे मदत होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. संविधानाच्या उद्देशिकेतल्या मूल्यांचा अंगिकार नागरिकांनी केल्यास देशातले ९० टक्के प्रश्न कायमचे सुटतील अशी आशा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.
संपूर्ण संविधान प्रास्ताविका पार्क हा दोन एकर परिसरात साडेनऊ कोटी रुपये खर्चातून निर्माण करण्यात आला आहे.