गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातल्या जंगलात आज नक्षलवादी आणि पोलिसांत चकमक झाली. या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार झाले असून त्यात भामरागड दलमचा कमांडरचा आणि एका महिला नक्षलवाद्याचा समावेश आहे.
भामरागड तालुका आणि छत्तीसगड सीमेवर कवंडे गावात नक्षलवादी लपून असल्याची माहिती मिळाल्यावरुन संयुक्त शोध मोहिम सुरू केली होती. ही मोहिम सुरू असताना आज सकाळी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात चार नक्षलवादी मारले गेले. चकमक झालेल्या ठिकाणी मोठा शस्त्रसाठा हाती लागला.
मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली असून त्यात भामरागड दलमचा कमांडर सन्नू पुंगाटी याचा समावेश आहे. त्याच्यावर आठ लाख रुपयांचं बक्षिस होतं. तर अन्य तिघं हे दलमचे सदस्य असून त्यांच्यावर प्रत्येकी दोन लाखांचं बक्षिस होतं. मारलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एका महिलेचा समावेश असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी वार्ताहर परिषदेत दिली.
छत्तीसगडमध्ये आज एकूण ३३ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. त्यांच्यावर सुमारे ९० लाख रूपयांचं बक्षिस होतं. विजापूर जिल्ह्यात २४ माओवाद्यांनी शरणागती पत्करली. गोळीबार, आईडी स्फोट, जाळपोळ यासारख्या प्रकरणांमध्ये त्यांचा हात होता, असं पोलीस अधिक्षकांनी सांगितलं.
दंतेवाडा जिल्ह्यात ९ माओवाद्यांनी पोलिसांपुढं आत्मसमर्पण केलं. त्यापैकी चौघांवर साडेतीन लाखांचं बक्षिस होतं. छत्तीसगड सरकारच्या पुनर्वसन धोरणानुसार या सर्व माओवाद्यांना प्रत्येकी ५० हजार रूपये दिले जाणार आहेत.