मराठा इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या १२ गड किल्ल्यांना युनेस्को- जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळाल्याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. यामुळे भारतातल्या जागतिक वारसास्थळांची संख्या आता ४४ झाली आहे. जागतिक वारसास्थळं समितीची ४७वी बैठक पॅरिसमधे काल झाली, त्यात हा निर्णय झाला. यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसंच तामिळनाडूतला जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मराठा साम्राज्याची ओळख सुशासन, समाजकल्याण, लष्करी सामर्थ्य आणि सांस्कृतिक अभिमानाशी निगडित असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी देखील या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.