छत्तीसगडमध्ये सुकुमा जिल्ह्यात काल 15 नक्षलवाद्यांनी पोलिस अधीक्षक किरण चव्हाण यांच्या समोर आत्मसमर्पण केलं. यामध्ये 10 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे. यापैकी काही नक्षलवाद्यांवर 8 लाखांच बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. माडवी हिडमा या नक्षलवाद्याच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या भीतीमुळं या नक्षलवाद्यांनी समर्पण केलं असल्याचं पोलिस अधीक्षक चव्हाण यांनी सांगितलं. छत्तीसगडमध्ये आत्तापर्यंत 650 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे.
दरम्यान सशस्त्र संघर्ष सोडून मुख्य प्रवाहात येण्याची आपली इच्छा असून 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत सुरक्षा दलांची कारवाई स्थगित करावी अशी मागणी करणारं पत्रक नक्षली संघटनेच्या एमएमसी झोन अर्थात महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड प्रदेश समितीने तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे जारी केलं आहे. अनंत या नावाने नक्षली प्रवक्त्याने हे पत्रक जारी केलं आहे. सशस्त्र संघर्षाला विराम देण्याची आपली इच्छा असून आपसात संवाद साधण्यासाठी फेब्रुवारी पर्यंतची वेळ हवा असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे.