छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराजांना वंदन केलं आहे.
शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक, हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी राजे यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा, अशा शब्दात फडनवीस यांनी संभाजी महाराजांना अभिवादन केलं आहे. यावेळी मंत्रालयातले अधिकारी, कर्मचारी यांनीही संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.
हिमालयाएवढे शौर्य असलेले महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलं आहे.
नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनामध्ये तसंच, महाराष्ट्र परिचय केंद्रात आज संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात स्थापन झालेल्या छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अभ्यासक्रम तयार करून नव्या पिढीसमोर त्यांचा जाज्वल्य इतिहास आणि शौर्यगाथा पोहोचवल्या जाव्यात, असं आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले. छत्रपती संभाजी महाराज जयंतीचं औचित्य साधून विद्यापीठात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राचं उद्घाटन करताना ते बोलत होते.
नांदेड शहरात सांगवी बुद्रुक इथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला होता.