चांद्रयान-२ नं आपल्या वैज्ञानिक उपकरणांच्या साहाय्यानं सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणाऱ्या ‘कोरोनल मास इजेक्शन’ चा चंद्रावर पडणारा प्रभाव पहिल्यांदाच टिपला असून, हे विज्ञान क्षेत्रातलं ऐतिहासिक यश असल्याचं इस्त्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हटलं आहे.
चांद्रयान-२ नं टिपलेल्या नोंदींमुळे चंद्राचं बाह्य क्षेत्र, चंद्रावरचं विरळ वातावरण आणि त्याच्या पृष्ठभागावर होणारा अवकाशातल्या हवामानाचा प्रभाव समजून घ्यायला सहाय्य होईल, असं बंगळुरू इथल्या इस्रोच्या मुख्यालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. चांद्रयान-२ चं निरीक्षण चंद्रावरच्या वातावरणाबाबत वैज्ञानिक समज वाढवेल, तसंच भविष्यातल्या चांद्र मोहिमा आणि चंद्रावर मानवाच्या अधिवासाच्या योजनेत महत्वाची भूमिका बजावेल असं यात म्हटलं आहे. २२ जुलै २०१९ रोजी श्रीहरीकोटा इथून प्रक्षेपित करण्यात आलेल्या चांद्रयान-२ नं, २० ऑगस्ट २०१९ रोजी, चंद्राभोवतालच्या लंबवर्तुळाकार कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला होता. ७ सप्टेंबर २०१९ रोजी लँडिंगच्या प्रयत्नादरम्यान यानाचा विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता, तरी ते पूर्णपणे कार्यरत असून ते चंद्राच्या कक्षेत कार्यरत असल्याचं इस्रोनं म्हटलं आहे.