तरुणांमधल्या तंबाखूच्या व्यसनाच्या समस्येला तोंड देण्यासाठी केंद्राकडून राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिशानिर्देश जारी

तरुणांधील तंबाखूच्या व्यसनाच्या समस्येला तोंड देण्यासाठी कोणती पावलं उचलता येतील यासंबंधी केंद्र सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयासमवेत संयुक्तरीत्या राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना हे दिशानिर्देश दिले असून त्यामध्ये शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त बनवण्याच्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे उपाय सुचवण्यात आले आहेत. तंबाखूच्या व्यसनामुळं होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांची माहिती देऊन त्याबद्दल भावी पिढ्यांना सजग करणं आणि शैक्षणिक संस्थांमध्ये तंबाखूच्या वापराला आळा घालणं हा त्यामागचा उद्देश आहे. विशेषतः लहान आणि किशोरवयीन मुलांवर तंबाखू सेवनामुळे घातक परिणाम होऊ शकतात हे या मार्गदर्शक सूचनांमध्ये प्रकर्षानं अधोरेखित करण्यात आलं आहे.