भारतीय हॉकीच्या गौरवशाली शंभर वर्षांचा उत्सव आज देशभर साजरा करण्यात येणार आहे. शताब्दी समारंभाच्या निमित्तानं, ५५० जिल्ह्यांमध्ये १४०० हून अधिक सामने आयोजित करण्यात आले आहेत. मुख्य कार्यक्रम आज सकाळी साडे आठ वाजता नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदानावर होईल, यामध्ये भारतीय हॉकीचा गौरवशाली प्रवास दाखवणारे विशेष कार्यक्रम होतील.
हॉकी इंडियाच्या पुरुष आणि महिला खेळाडूंचा समावेश असलेला विशेष सामना यावेळी होणार आहे. या कार्यक्रमात हॉकीमध्ये उल्लेखनीय योगदान दिलेल्या दिग्गजांचा सत्कार, “भारतीय हॉकीची शंभर वर्षे” या खंडाचं प्रकाशन, तसंच भारतीय हॉकीच्या शतकी वाटचालीचा आढावा घेणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.