जातनिहाय जनगणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी स्वागत केलं आहे. यामुळे गरजू नागरिकांच्या प्रगतीसाठी धोरणं आखायला यामुळे मदत होईल, असं ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वपूर्ण पाऊल आहे, असं त्यांनी म्हटलंय.
तर, केंद्र सरकारनं घेतलेला जात जनगणनेचा निर्णय फसवा असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. जनगणना कधी करणार याबाबत सरकारनं खुलासा केलेला नाही, असं त्यांनी म्हटलंय. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र, ही घोषणा बिहारच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केली की काय अशी शंका येते असं ते म्हणाले.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केंद्र सरकारच्या जातनिहाय गणना करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. केंद्र सरकारनं उचललेलं हे पाऊल सकारात्मक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांनीही केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं असून केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे राष्ट्रीय जनता दलानं केलेल्या मागणीचा विजय असल्याचं म्हटलं आहे. जातनिहाय जनगणनेबाबतचा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल संपूर्ण देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ऋणी राहील, असं भाजपा नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी म्हटलं आहे.