बदलत्या तंत्रज्ञानानुसार आत्मनिर्भर होण्यासाठी सैन्य दलात दाखल होणाऱ्या छात्रांनी सक्षम राहावं असं आवाहन केंद्रीय लोकसेवा आयोगाचे प्रमुख डॉक्टर अजय कुमार यांनी काल पुण्यात केलं. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४९ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आगामी शतकातील युद्धांमध्ये शहाणपणा, सहानुभूती आणि बुद्धिमत्तेनं जो नेतृत्व करेल त्याचाच विजय होईल असंही त्यांनी अधोरेखित केलं. या तुकडीचं दीक्षांत संचलन आज सकाळी एनडीए च्या मैदानावर सुरू असून नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.
काल या दीक्षांत समारंभात ३२९ स्नातकांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये ७२ स्नातकांना विज्ञान, ९२ संगणक विज्ञान, ५४ कला शाखा आणि १११ स्नातकांना बी टेक पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये १५ मित्र देशांच्या स्नातकांचा तर १५ महिला स्नातकांचा समावेश आहे. प्रबोधिनीचे कमांडंट व्हाइस ऍडमिरल अनिल जग्गी, प्राचार्य डॉक्टर विनय दीप यावेळी उपस्थित होते. विज्ञान शाखेचं रौप्य पदक कार्तिक महेश्वरी, संगणक विज्ञान रौप्य पदक अनन्या बालोनी, कला शाखा रौप्य पदक अनुराग गुप्ता, बी टेक रौप्य पदक पुण्याच्या विश्वेष भालेराव यांना यावेळी प्रदान करण्यात आलं.