रबी हंगामासाठी खतांवर ३७ हजार ९५२ कोटी अनुदान देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज नवी दिल्लीत झाली, त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. यामुळे शेतकऱ्यांना वाजवी दरात खतं उपलब्ध होतील, असं वैष्णव म्हणाले. खतांचे आंतरराष्ट्रीय दर लक्षात घेऊन खतांच्या अनुदानाचे नवे दर निश्चित केल्याचं त्यांनी सांगितलं. हे दर एक ऑक्टोबरपासून लागू होतील.
आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. विविध मंत्रालयं, राज्य सरकारं यांच्याशी चर्चा केल्यानंतर या संदर्भ अटी निश्चित केल्या गेल्या, असं वैष्णव यांनी सांगितलं. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आठवा वेतन आयोग अठरा महिन्यांच्या आत आपल्या शिफारशी करेल, याचा लाभ ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे, असं वैष्णव म्हणाले.