डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अर्थसंकल्प २०२४ : नवीन आयकर प्रणाली अंतर्गत वाढीव करसवलती

नवीन आयकर प्रणालीचा स्वीकार करणाऱ्यांसाठी आणखी कर सवलतींचा लाभ देण्याची घोषणा सीतारामन यांनी आजच्या अर्थसंकल्पात केली. अतिरीक्त १ लाख रुपयांच्या उत्पन्नाला त्यांनी विद्यमान दरापेक्षा कमी कर लादण्याची घोषणा केली. त्यामुळं पगारदारांना आता साडे १७ हजार रुपये कमी आयकर भरावा लागेल. नवीन कर प्रणालीत आता ३ लाख रुपयांपर्यंत काहीही कर द्यावा लागणार नाही. ३ ते ७ लाख दरम्यान उत्पन्न असणाऱ्यांना ५ टक्के, ७ ते १० लाख दरम्यान उत्पन्न असणाऱ्यांना १० टक्के, १० ते १२ लाख दरम्यान उत्पन्न असणाऱ्यांना १५ टक्के, १२ ते १५ लाख दरम्यान उत्पन्न असणाऱ्यांना २० टक्के आणि त्यापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना ३० टक्के दराने आयकर भरावा लागेल. 

 

नव्या कर रचनेचा पर्याय स्वीकारणाऱ्यांना आता ५० हजारांऐवजी ७५ हजार रुपयांचा स्टँडर्ड डिडक्शन अंतर्गत लाभ मिळेल. निवृत्तीवेतन धारकांसाठी हा लाभ १५ हजारांवरुन २५ हजार रुपये केल्याचं त्यांनी जाहीर केलं. 

 

गेल्या आर्थिक वर्षात आतापर्यंत दोन तृतीयांश करदात्यांनी नवीन आयकर प्रणालीचा पर्याय स्वीकारल्याची माहिती त्यांनी दिली. नवीन पेन्शन योजनेतल्या कर्मचाऱ्यांना एनपीएसमध्ये भरणा केलेली १० ऐवजी १४ टक्के रक्कम करसवलतीसाठी पात्र असेल. 

 

लहान मुलांच्या नावे नव्या पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्यासाठी एनपीएस वात्सल्य योजनेची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. त्यानुसार पालक त्यांच्या मुलांच्या नावे नवीन पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकतील. मुलं मोठी झाल्यावर याचं रुपांतर नियमित एनपीएस खात्यात करता येईल. 

 

नव्या पेन्शन योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभांचा आढावा घेणाऱ्या समितीचं काम सुरू आहे. वित्तीय परिस्थिती लक्षात घेऊन नवीन आणि जुनी पेन्शनमधली तफावत दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं त्यांनी आज जाहीर केलं. वर्तमान आयकर कायद्याचा सर्वंकष आढावा घेऊन तो सोपा करण्याचा मानसही त्यांनी जाहीर केला.