डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अर्थसंकल्प २०२४ : भविष्य निर्वाह निधी धारकांसाठी विविध सवलतींची घोषणा

भविष्य निर्वाह निधी धारकांसाठी विविध सवलतींची घोषणा आज अर्थमंत्र्यांनी केली. त्यानुसार पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या सर्व नोकरदारांच्या खात्यामध्ये एका महिन्याचा पगार जमा होईल. दर महिन्याला एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या सुमारे २१ कोटी  युवकांना याचा फायदा होणार आहे. रोजगार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठीही त्यांनी काही आर्थिक सवलती जाहीर केल्या. 

 

उत्पादन आणि सेवा क्षेत्रांना चालना देण्यासाठी येत्या पाच वर्षांत देशातल्या आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये एक कोटी युवकांना वर्षभरासाठी इंटर्नशिपची संधी दिली जाणार आहे. यात त्यांना प्रति महिना ५ हजार रुपये आणि वर्षातून एकदा ६ हजार रुपये दिले जातील, असं सीतारमण यांनी जाहीर केलं. 

 

तसंच सरकारी आणि खासगी भागीदारीतून जवळपास १०० शहरांमध्ये गुंतवणुकीसाठी सज्ज असलेली प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क्स विकसित केली जाणार आहेत. राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत १२ औद्योगिक पार्क्सनाही मंजुरी देण्यात येणार आहे. 

 

औद्योगिक क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना सरकारी आणि खासगी भागीदारीतून भाडेतत्त्वावर निवासाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिलांची संख्या वाढवण्यासाठी संबंधित क्षेत्रांशी सहकार्य प्रस्थापित करून नोकरदार महिलांसाठीची वसतीगृहं, तसंच पाळणाघरं उभारली जातील. राज्य सरकारांशी समन्वयाने पाच वर्षांच्या काळात २० लाख युवांना कौशल्याधारित प्रशिक्षण दिलं जाईल. यासाठी कौशल्य आणि शैक्षणिक कर्जाचीही सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सीतारामण यांनी दिली.