देशभरात आज बुद्धपौर्णिमा साजरी केली जात आहे. बिहारमध्ये बुद्धगया इथं थायलंड, व्हिएतनाम आणि म्यानमार या देशांमधून लाखो अनुयायी बुद्धजयंतीनिमित्त दाखल झालेत. यानिमित्तानं महाबोधी विहारात विशेष प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुद्धपौर्णिमेनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. सत्य, समानता आणि सौहार्द या तत्वांवर आधारित भगवान बुद्धांची शिकवण मानवतेसाठी मार्गदर्शक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
राज्यात विविध ठिकाणी बुद्धपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. नाशिकमध्ये बुद्ध स्मारक इथं धम्म ध्वजारोहण, बुद्ध वंदना आणि बोधी वृक्ष वंदनेसह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. परभणी जिल्ह्यात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पंचशील ध्वज फडकवण्यात आला. तर नागपूर जिल्ह्यात कामटी इथल्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल इथंही आज विशेष बुद्ध वंदना आयोजित करण्यात आली होती. कोल्हापुरात विविध सामाजिक शैक्षणिक संस्था संघटनांनी भगवान बुद्धांच्या मूर्ती आणि प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तर बीड जिल्ह्यात अंबाजोगाई शहरासह ठिकठिकाणी धम्म रॅली काढण्यात आली.