अतुलनीय शौर्य, धैर्य दाखवून प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी देशाचं संरक्षण केलं असून देशाला त्यांचा अभिमान असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. सीमा सुरक्षा दलाच्या ६१व्या स्थापनादिनानिमित्त गुजरातमध्ये भूज इथे आयोजित संचलन समारंभात ते बोलत होते. गेली सहा दशकं सीमा सुरक्षा दल देशाच्या सीमांचं रक्षण करत असून हे दल सीमेवर असताना शत्रू एक इंचही घुसखोरी करू शकत नाही, हे संपूर्ण जगाला दाखवून दिल्याचं शहा म्हणाले.
गृह मंत्रालयाने पुढच्या पाच वर्षांत बीएसएफला जगातलं सर्वात आधुनिक दल बनवण्याचं लक्ष्य ठेवलं असून पुढचं एक वर्षं सीमा सुरक्षा दलाच्या आधुनिकीकरणासाठी आणि जवानांच्या कल्याणासाठी समर्पित असेल, अशी घोषणाही शहा यांनी यावेळी केली. या कार्यक्रमात शहा यांनी सीमा सुरक्षा दलाच्या शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण केली. तसंच शहीदांच्या स्मरणार्थ काढलेल्या टपाल तिकीटाचं अनावरण केलं आणि दलाने संचलनातून दिलेली मानवंदनाही स्वीकारली. यावेळी शहा यांच्या हस्ते बीएसएफ जवानांना शौर्य पदकं प्रदान करण्यात आली.