ब्रिक्स राष्ट्रांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी वचनबद्धता दर्शवली. तसंच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. परराष्ट्र मंत्रालयातल्या आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव दम्मू रवी यांनी ब्रिक्स परिषदेच्या पहिल्या दिवसानंतर रिओ मधे वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. ब्रिक्स देशांच्या नेत्यांनी रिओ द जानिरो मधे झालेल्या परिषदेनंतर प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील देशांच्या दृष्टीने महत्त्वाच्या सर्व मुद्द्यांना स्पर्श केला आहे. या जाहीरनाम्यामुळे भारताच्या शेजारी देशांना कठोर संदेश गेला आहे असं ते म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इतर महत्त्वाच्या विषयांबरोबरच ब्रिक्स देशांनी मिळून विज्ञान आणि संशोधन विषयक रिपॉझिटरी भांडाराची स्थापना करावी असं सुचवलं. महत्त्वाची खनिजं, पुरवठा साखळी, कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादी क्षेत्रांवर त्याचा भर राहील. जागतिक पातळीवर काम करणाऱ्या अनेक संस्थांमधे तातडीनं सुधारणा करण्याची गरज मोदी यांनी परिषदेत मांडली.
प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या ४ महत्त्वाचे सामंजस्य करार ब्राझिल बरोबर होणार असल्याचं भारताचे राजदूत दिनेश भाटिया यांनी सांगितलं. दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी माहितीची देवाण घेवाण, नवीकरणीय ऊर्जा, कृषी संशोधन या क्षेत्रात हे करार होणार आहेत.