ब्राझीलमधल्या बेलेम इथे सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत अर्थात ‘कॉप ३०’ मध्ये अखेरीस हवामान कराराच्या मसुद्यावर सर्व जागतिक नेत्यांचं एकमत झालं आहे.
गेले दोन आठवडे सुरू असलेल्या या परिषदेच्या समाप्तीनंतरही काल रात्रभर लांबलेल्या चर्चेनंतर हा मसुदा तयार झाला असला तरीही त्यात जीवाष्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी पुरेशा उपाययोजना मात्र समाविष्ट नाहीत. हवामानसंबंधित व्यापार नियमांचा आढावा घेण्याचं तसंच विकसित देशांनी विकसनशील देशांना नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी पुरेसा वित्तपुरवठा करण्याचं आवाहन या मसुद्यात करण्यात आलं आहे.
पॅरिस करारात ठरलेल्या तापमान वाढीच्या मुद्द्यावर सर्व नेत्यांनी पुन्हा एकदा सहमती दर्शवली असून ब्राझील कराराचा मसुदा म्हणजे हवामान कृतीच्या दिशेने टाकलेलं महत्वाचं पाऊल असल्याचं मसुद्यात म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या परिषदेला अमेरिकेचा एकही प्रतिनिधी पाठवला नव्हता.