डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही विविध कारणांवर गदारोळ होऊन आधी दुपारी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या वागणुकीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. सभागृहाच्या सभ्यतेचे पालन केलं जावं,तसंच देशातल्या जनतेच्या आशाआकांक्षांचा आदर राखत काम केलं जावं, असं आवाहन त्यांनी विरोधी नेत्यांना केलं.  

 

राज्यसभेतही असंच चित्र दिसून आलं. आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनी दिल्लीतल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाल्यानं अध्यक्ष जगदीप धनखड यांनी कामकाज तहकूब केल्याचं जाहीर केलं.

 

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी चर्चा आणि वादविवाद यांच्या माध्यमातून संसदेचं कामकाज चालवण्याचं आवाहन संसद सदस्यांना केलं आहे. कॉग्रेस नेते राहुल गांधी यांचा संसदीय लोकशाहीवर विश्वास नसावा, अशी टीकाही रिजिजू यांनी संसद भवन परिसरात बातमीदारांशी बोलताना केली . 

 

त्यापूर्वी आज सकाळी संसद भवन परिसरात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देशातल्या प्रमुख उद्योगसमूहानं केलेल्या तथाकथित लाचखोरीच्या  मुद्द्यावरून निदर्शनं केली. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, झारखंड मुक्ती मोर्चाच्या  महुआ माझी, डी एम के च्या कनिमोळी इत्यादी नेते यात सहभागी झाले होते.