मुंबई आणि नागपूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज ‘मिशन मुंबई’ हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात मुंबई महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या मराठी शाळा सुरू करणं, शाळांमध्ये योग्य व्यवस्था उपलब्ध करणं, बेस्ट बसेस वाढवणं, मुंबईकरांना चांगली आरोग्य व्यवस्था, स्वच्छ पाणी आणि हवा देणं यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. मिशन मुंबई ही केवळ निवडणुकीची घोषणा नसून मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून शहराचा सर्वांगीण विकास घडवण्याचा निर्धार आहे. पाणी, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, स्वच्छता, पर्यावरण, सार्वजनिक सेवा आणि सुरक्षितता या प्रत्येक मुद्द्यावर, लोकांच्या गरजांवर आधारित, पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन देणं हे आमचं उद्दिष्ट आहे, असं प्रतिपादन मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केलं. वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पक्षाचा गवई गट, राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यासोबत काँग्रेस ही निवडणूक लढवत आहे.

 

नागपूर महापालिकेसाठीचाही काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला. नागरिकांना दर्जेदार आणि प्रभावी मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काँग्रेसनं २० सूत्रांचा जनहितकारी आराखडा सादर केला. त्यात स्वच्छ, सुरक्षित आणि स्मार्ट नागपूर घडवण्याचा ठाम संकल्प व्यक्त करण्यात आला आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.