आतापर्यंत आलेल्या निकालानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेत भाजपा आणि शिवसेना महायुतीला निर्णायक आघाडी मिळणार हे आता स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपा ७० जागांवर तर शिवसेना २१ जागांवर विजयी झाली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ४८ जागांवर तर राज ठाकरे यांच्या पक्षाला केवळ ५ जागांवर यश मिळालं आहे. काँग्रेसने १९ जागा जिंकल्या.
ठाणे महानगरपालिकेत शिवसेना ३४, भाजपा १७, राष्ट्रवादी काँग्रेस ४ ठिकाणी विजयी झाले आहेत. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे आघाडीच्या पदरी सपशेल निराशा पडली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार केवळ एक जागा मिळाली आहे तर मनसेला भोपळाही फोडता आला नाही. दुसरीकडे काँग्रेसने पाच, शरद पवार यांच्या पक्षाने पाच आणि अजित पवार यांच्या पक्षाने चार जागा जिंकल्या आहेत.
कल्याण डोंबिवलीत भाजपाने ३२ तर शिवसेनेने २९ ठिकाणी विजय मिळवला आहे.
नवी मुंबईमधे भाजपा ५१ जागा जिंकत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यांच्या खालोखाल शिवसेनेला ३७ जागा जिंकण्यात यश मिळालं.
भिवंडी निजामपूर मधे काँग्रेसने तीस जागा जिंकल्या आहेत. भाजपाने २२ तर शिवसेनेने १२ ठिकाणी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाही बारा ठिकाणी यश मिळालं आहे.
वसई विरारमधे बहुजन विकास आघाडीने महानगरपालिकेची सत्ता कायम राखली आहे. इथं भाजपाला ४३ जागा जिंकण्यात यश मिळालं आहे तर शिवसेनेला आतापर्यंत केवळ एक जागा जिंकता आली.
पनवेल मधे ५५ जागा तर मीरा भाईंदरमधे ७८ जागा जिंकत भाजपाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. पनवेलमधे काँग्रेसला चार, शिवसेनेला दोन, राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा जिंकता आल्या.
मीरा भाईंदरमधे काँग्रेसने तेरा जागा जिंकल्या आहेत तर शिवसेनेला तीन जागांवर यश मिळालं आहे.
उल्हासनगरमधे स्वबळावर लढलेल्या शिवसेनाला ३४ जागांवर विजय मिळाला आहे. तर पप्पु कलानी यांच्यासोबत आघाडीत असलेल्या भाजपाने २२ जागा जिंकल्या आहेत.