बिहारच्या निवडणुकीत यश मिळणार नाही हे लक्षात आल्यावर काँग्रेस नेता राहुल गांधींनी हरियाणातला बनावट मतदारांचा मुद्दा उपस्थित केल्याची टीका केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते किरेन रिजीजू यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत केली. हरियाणात काँग्रेसचा पराभव झाल्याबद्दल राहुल गांधी भाजपाला दोष देत आहेत. मात्र काँग्रेस अंतर्गत विसंवादामुळे त्यांचा पराभव झाल्याचं त्यांच्याच नेत्या कुमारी शैलजा यांनी सांगितलं होतं, असं रिजीजू म्हणाले. निवडणुकीत भाजपाने हस्तक्षेप केल्याचा आरोप फेटाळून लावत गांधी विदेशात जाऊन देशातल्या यंत्रणांवर टीका करतात असं रिजीजू म्हणाले. मतदानापासून मतमोजणीपर्यंतची प्रक्रिया पारदर्शक असते, काँग्रेसला काही शंका असेल तर त्यांनी न्यायालयात जावं असा सल्लाही त्यांनी दिला.
त्याआधी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत हरियाणा विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे आरोप केले. हरियाणा विधानसभा निवडणुकीत २५ लाख बनावट मतदार तयार करण्यात आले, असा गंभीर आरोप गांधी यांनी केला. यावेळी एकाच छायाचित्राच्या नावासमोर वेगवेगळी नावं असल्याचं गांधी यांनी निदर्शनास आणून दिलं. तसंच दुबार मतदार आणि मतदारांचे चुकीचे पत्ते मतदार यादीत नोंदवले गेल्याचा आरोप केला.