भारत आणि युरोपियन युनियनच्या व्यापार मंत्र्यांनी प्रस्तावित मुक्त व्यापार कराराशी संबंधित अडचणी दूर करून कराराला अंतिम रूप देण्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांना याबाबतच्या वाटाघाटींना वेग देण्याचे निर्देश दिले आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि युरोपियन युनियनचे व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयुक्त मारोस सेफकोविक यांनी आज ब्रुसेल्समध्ये परस्परांची भेट घेतली आणि वाटाघाटींच्या प्रगतीचा आढावा घेतला.
वस्तूंसाठी बाजारपेठ प्रवेश, उत्पत्तीचे नियम आणि सेवा, यासह वाटाघाटींच्या विविध टप्प्यांवर झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यावर यावेळी भर देण्यात आला. मंत्रीस्तरीय बैठकीपूर्वी वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल आणि युरोपियन कमिशनच्या व्यापार महासंचालक सबाइन वेयंड यांच्यात उच्चस्तरीय चर्चा झाली.
परस्परांबरोबरच्या मुक्त व्यापार कराराबाबतच्या वाटाघाटी लवकर पूर्ण करण्याचा दोन्ही बाजूंचा प्रयत्न असून, त्यादृष्टीने आजची बैठक महत्वाची ठरेल, असं अधिकृत निवेदनात म्हटलं आहे.