आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा भाजपा आणि जदयू प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं आज प्रसिद्ध केला. यात तरुण, रोजगार, कौशल्यविकास, शेतकरी, मागासवर्गीय, दलित आणि महिलांचं सक्षमीकरण यावर भर दिला असून येत्या पाच वर्षांत १ कोटी सरकारी नोकऱ्या आणि रोजगार निर्माण करायचं, तसंच एक कोटी महिलांना लखपती दीदी करायचं आश्वासन एनडीएनं दिलं आहे.
शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीची हमी, प्रत्येक उपविभागात दलित विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांना १० लाख रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य, तसंच किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्यात ३ हजार रुपयांची वाढ, प्रत्येक जिल्ह्यात मेगा कौशल्य केंद्रं आणि राज्यात १० नवी औद्योगिक संकुलं उभारली जातील, असंही जाहीरनाम्यात म्हटलं आहे.
हा जाहीरनामा म्हणजे बिहारच्या नागरिकांसाठीचं एनडीएचं शपथपत्र आहे, असं प्रतिपादन भाजपाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी प्रकाशनानंतर वार्ताहरांशी बोलताना केलं.
 
									 
		 
									 
									 
									 
									